Sunday, February 12, 2017

आम्ही तुझी वाट पहातोय!

कृष्णा आम्ही तुझी वाट पहातोय
तुझ्या प्रत्येक जन्मदिवशी
तुझ्या पर्यन्त पोहोचण्यासाठी
माणसांचे अनेक उंच मनोरे रचून
आम्ही तुझी वाट पहातोय
माजलेत कंस अनेक जगभर.
तुडवीत आहेत अगणित आयुष्य.
तुझ्या भावंडांचे आजही पडत चाललेत मुडदे तसेच.
चिरड्ल्या जात आहेत अनेक निरागस इच्छा कुणा महत्वाकांक्षे साठी.
त्या सिरियन बालकांच्या एखाद्या बेवारस पडलेल्या कलेवरातुन तु जन्म घेशील
या वेड्या आशेवर
आम्ही तुझी वाट पहातोय
कालिया अनेक गिळत सुटलेत अव्याहतपणे इथले नदी नाले अन झाडे.
फूत्कार टाकत आहेत रस्तोरस्ती. जाळत सुटलेत श्वास .
विष भिनत जातेय इथल्या प्र्त्येक शरीरात आणि मग तिथून ताबा घेत जातेय जीवांचा.
त्या शुष्क वठत चाललेल्या भुमितुन
तु एक अंकुर बनुन उगवशील अन तुझी ही बुडत जाणारी द्वारका पुन्हा वसवशील
या वेड्या आशेवर
आम्ही तुझी वाट पहातोय
अनेक द्रौपदी आहेत आजही.
जागोजागी टपुन बसलेल्या हजारो दुशासनांशि नित्याची झटपट करणार्या.
अजूनही  तश्याच भेदरलेल्या; लाळघोट्या नजरा चुकविणार्या.
निर्मनुष्य रस्त्यांवर, कधी नाक्यावर तर
कधी त्याधावत्या बस मध्ये.
पण यंदा त्यांचे वस्त्र बनून येण्याऐवजी
त्यांचे सुदर्शन बनून तु येशील
या वेड्या आशेवर
आम्ही तुझी वाट पहातोय
अर्जुन तसेच हिंडत आहेत अगतिकपणे.
सारासार विचारांचे गांडीव गळून पडलय त्यांचेही. अंधारमय रस्त्यांवर धावत सुट्लेत त्यांचे रथ वाट फुटेल तिथे बेलगाम आणि आपसूक हाती पडत चाल्लेत देशद्रोह्यानच्या.
वापरले जात आहेत धर्माच्या नावाने स्वदेशाविरूध्द स्वदेशाच्याच बरबादी साठी.
त्यांच्या रथाचा सारथी बनून जीवनाच्या कुरुक्षेत्रा वर त्यांना पुनश्च सन्मार्गी करशील या वेड्या आशेवर
आम्ही तुझी वाट पहातोय.
एखाद्या गायीच्या गळ्यातल्या घंटारवातुन
बासरीच्या मंजुळ पहाटस्वरातुन
एखाद्या मीरे च्या आर्त भजनातुन
कुण्या एखाद्या पक्ष्याच्या केकारवतुन
तु पुन्हा जन्म घेशील
अश्या वेड्या आशेवर
कृष्णा आम्ही तुझी वाट पहातोय
– दर्शन

No comments:

Post a Comment