Sunday, February 12, 2017

चारोळ्या

आणखी एक रात्री असाच
तुझ्यापासून दुरावलोय
पण स्वप्नातल्या भेटीला तुझ्या
चांगलाच सरावलोय
सवयीच झालय आता
तुझी वाट पहाणे
जमू लागलेय मला असे
तुझ्यात गुंतून रहाणे
स्मित तुझ्या गालांवरचे
अन केसांचा पडदा हलता
दिवस हा सुरू व्हावा
तुझ्या बटांवर झुलता
रिपरिपत्या प्रेमाने
मनाला माझ्या भिजवतेस
मग चांद्ण्यांच्या रांगोळी ने
अख्खी रात्र सजवतेस
बासरी चे स्वर आज
चुकून फसले
जेव्हा राधेचे बोलके ओठ
स्वतःशीच हसले
पौर्णिमे चि टिपूर रात्र
अन तुझं दूर असण
जणू पाण्यातल्या बिंबात
चंद्राला शोधत बसण
तु मी अन तुझे बरसते शब्द
मग तो मावळता सूर्यही
काहीसा होतो स्तब्ध
स्वप्नाविना तुझ्या सखे
मावळेना रात्र ही
मिट्ता न मिटती पापण्या
जरी थकली गात्रही
दर रात्री तुझ्या आठवणी
आभाळ भर उगवतात
मग माझ्या सोबत त्यासुद्धा
सारी रात्र जागवतात
कटाक्ष तुझा तिरपा
अन ते तिरपे कवडसे उन्हाचे
उबदार या सकाळी
फुलवती ताटवे मनाचे
आजही समुद्र संध्येची
वाट पाहत बसतो
मग मलाही पाहतो किनारी
अन हळूच गालांत हसतो
क्षितिज व्यापून टाकणारी
या संध्येची लाली
जणु तुझ्या स्पर्शाने ओठांच्या
ती चिंब चिंब न्हाली
तुझ्या डोळ्यांच्या झरोक्यातुन
मनीचा तुझ्या ठाव घेउदे
तुझ्या मनाच्या उंबऱ्यावर
मला छोटीशी जागा मिळुदे
का प्रत्येक पहाट अवघी
तुझ्यासवे वाटे नवी
का हे सलज्ज पुष्प
स्पर्शतो अवखळ रवी
काल स्वप्नांच्या नगरीत
तुझी वाट पाहिली
सरत्या रात्री आलीस
म्हणून रात्रही थांबून राहिली
नाजूकश्या तुझ्या पाउलानी
पहाट यावी न्यारी
दिवसावरी या साऱ्या तुझी
पाउलेच उमटावी सारी
सवय तुझी नेहमीचिच
स्वतःशी बोलण्याची
मला असते एक संधी
तुझ्या मनात शिरण्याची
तुझ्या पुढे रिता होतो
माझ्या मनाचा घडा
तुझ्या मनाच्या अंगणी मग
माझ्या भावनांचा सडा
अर्ध्या रात्री अशी मैफलीतुन
निघून जाशील दुर
मग सजविलेल्या भैरवी चे
कसे जुळतील सुर
आठवांची तुझ्या सर
ओसरता ओसरेना
तुझ्या प्रेमाची घागर
काही भरता भरेना
आस लागून राही मला
तुझ्या एकदा तरी दिसण्याची
माझ्या नेत्रान्नीच काढतो नजर
तुझ्या गोड हसण्याची
– दर्शन

नकाब

एक नकाब वाला घुमता था…
कभी गलियां , कभी शहरो मे, कभी गाओ , तो कभी मेले मे….
तरह तरह के नकाब रहते थे पास उसके….
जानवर थे कुछ तो कुछ थे जोकर, कुछ भगवान भी रहते थे लटकते कई राक्षसोंकेबिच…
कुछ हसते, कुछ मुस्कुराते, कुछ रोते… कुछ तो ऐसे थे कि जैसे साप सूंग गया हो….
नकाब भी ऐसे की नकाब नही जिंदगिया  हो अलग अलग इनकी…
खरीदकर कोइ अपने दर्द छुपाता तो कोइ असलियत…. कुछ तो खुशिया तक छुपा जाते थे इनसे ढककर.
एक दिन उससे पुछा तुम्हे कौनसा पसंद है इनमे….
उसने कहा साहब भूख पर चढनेवाला बनाने मे जुटा हूँ…
बनतेही बेचने आ जाउंगा
दर्शन

युध्द

रे जीवना तुझ्या विरूध्द
तुझ्याचसाठी लढतो आहे
खवळलेल्या सागरा वरची
हिंदकळनारी नाव जसा मी
उसळणार्या लाटांनाही
पुरून तरी मी उरतो आहे.
रे जीवना तुझ्या विरूध्द
तुझ्याचसाठी लढतो आहे
खळगे शेकडो अडवती वाटा
नियती पेरते काटे तरीही
विश्वासाची वहाण घालुनी
लांघुनी सर्वा धावतो आहे
रे जीवना तुझ्या विरूध्द
तुझ्याचसाठी लढतो आहे
वाद्ळ् वारे सोसाट्याचे
संकटांचा पडो पाऊस कितीही
करून मन पोलादी कणखर
वार तयाचे टोलवितो आहे
रे जीवना तुझ्या विरूध्द
तुझ्याचसाठी लढतो आहे
रे जीवना प्रवाह तुझा जणू
उधाणलेली नदी प्रवाही
प्रवाहात त्या सुर मारुनी मग
उलट दिशेसी पोहतो आहे
रे जीवना तुझ्या विरूध्द
तुझ्याचसाठी लढतो आहे.
तुझ्याच भूमीवरी युद्ध तुझ्याशी
हारजीत हा खेळची सारा
जीवनाचा सैनिक इथला
जगण्या साठी मरतो आहे
रे जीवना तुझ्या विरूध्द
तुझ्याचसाठी लढतो आहे.
– दर्शन

पाकळ्या

उमलल्या या पाकळ्या
जणू उमलति पापण्या तुझ्या
पहाटेची लालिमा जणू
पसरली गाली तुझ्या
ओठी झरावे अमृत
जणू मंदिरी घंटारव व्हावा
दिवस असा उमलत जावो
क्षणोक्षणी आनंद द्यावा.
— दर्शन

देश ये मेरा

केसरिया रंग मे रंगा
हर सर्फरोश गया फांसि पर झुल
अमन शांती के सफेद पंछी
हरी डाल पर कुके बुलबुल
रंगबिरंगा देश ये मेरा
रंगबिरंगा हर इक फुल
ऱंगिली है भुमी मेरी
ऱंगिली हैं इसकी धुल

शब्द

उगवती कधी ते डोंगरा आडून
राहती भरून आसमंति
कधी ओघळति गवता वरुन
बनून दवबिंदूचे मोती
खळाळती कधी ते पात्रातुनि नदीच्या
फोडीती पाझर पाषाणाना
कुजबुजत राहती चोचीतुनि पिल्ला च्या
मातेसि तयांच्या आर्त हाक देती.
कधी कोसळति बनूनिया बाण
कधी वाहती वाणी ओघवती
शब्द हेचि रत्ने शब्द शस्त्र होती
शब्द बनती धागा प्रेमाचाही
शब्दां ची ही माळ ठेवितो चरणीं
शब्दफुले अशी उमलती.
वास्तव्य  तुझे हे  वाणीवरि रहावे
हीच असे इछ्चा शेवटाची.
— दर्शन

मिलन

कृष्ण रात्रि या चंद्रप्रकाशी
वाट तो पाहतो यमुनातीरी
राधिकेचि बेचैन पाऊले
धावती घेउनी कलश शिरी
नयन मिटूनी तो कृष्णसखा
वाजवीतो स्वप्नवत बासुरी
हृदयातिल सुर असे दैवी
भरून रहाती चराचरी
अथक पाउले राधिकेचीहि
उमटत जाती धरणी वरी
पाश तोडूनी धावत राहती
ओलांडती भुमी अन गिरी
उत्तररात्री असे मिलन जाहले
जसा चंद्र स्पर्शतो क्षितिजावरी
ईश प्रकृती मिलन होतसे
कोसळती प्रेमाच्या सरी
— दर्शन

संवाद

भिजावे चिंब या डोही
तीरावरी वाजवावा पावा
मैत्री करावी निर्गुणाशी
आत्म्याशी संवाद असा व्हावा
गावी पहाटे भैरवी
रात्री मल्हार घुमावा
छेडावि तार प्रेमाची
हृदयातुनि सुर उमटावा
मनांतला संवाद हा
शब्द बनले भावना
जुळती धागे नवे
अर्थ येइ जीवना.
– दर्शन

मन

कधी वाचावे अपुलेच मन
जणू वाचावे पुस्तक उघडे
शेवटल्या कोऱ्या पानी
सापडे आपलेच रूपडे
प्रत्येक पान उलटता
आठवांचा पडदा सरकता
क्षणांच्या भरल्या ओळी
स्वप्नांचा निर्झर झिरपता
भरलेले सर्व समास
अन भरलेले सर्व रकाने
मधेच सापडली काही
सोडलेली कोरीच पाने
ती कोरी पाने वाचण्या
हृदया लागतसे दृष्टी
हितगुज मनाशी करता
दिसे आगळीच सृष्टी
दिसामाजी वाचावे
नेमेचि वेगळे पान
पुस्तक आपुल्या मनाचे
जणू भावनांचे फुलले रान
– दर्शन

अबोला तुझा

अबोला हा तुझा जणू काहिली उन्हाची
शुष्क वाळवंटी अवस्था मनाची
हिरवे परी दिसती मज निष्पर्ण हे वृक्ष
जणू जीर्ण मंदिरी शापित उभा यक्ष
किलबिलति पक्षी इथे गाती प्रेमगाणी
परि वाटतसे मजला ती विरहाचि विराणी
अस्वस्थ ही अवस्था मनाची हटेना
वैराण या भूमिस पालवी फुटेना
असह्य हा अबोला जशी असह्य काहिली
ठोठावितो द्वारे तुझी शोधितो साउली
– दर्शन

मल्हार

हसतेस अशी तु जेव्हा
उडती पुष्पांची कारंजी
सुर मल्हाराचे मनी
घालू लागतात रुंजी
– दर्शन

बंध

भावना आपल्या
जणू कस्तुरी चा गंध
गुंतती धागे असे
जणू रेशमा चे बंध
– दर्शन

प्रभात

संपता स्वप्नांची रात
घेउनी दिवा हातांत
आळवत भूपाळी चे सुर
उभी दाराशी प्रभात
पसरली रांगोळी धुक्याची
खगानी ऱेखाट्ल्या ओळी
स्पर्श तो किरणांचा होता
खुले सुर्यफुलाची कळी
मुकुटी रानफुले अबोली
माळुन दवबिंदुंची माला
भाळी हळदीचा मळवट
कटीवर उत्साहाचा घडा
सोनेरी अलंकार किरणांचे
उजळले पूर्वेचे आकाश
पहाट ही नववधू लाजरी
येइ उधळत प्रकाश
– दर्शन

किल्ला

आड वाटे वरी एका
किल्ला दिसे भग्न
आयुष्याची गणिते मांडत
बसला असे मग्न
जीर्ण विटा त्याच्या देती
साक्ष वैभवाची
नांदत होती येथे काही
माणसे जिवाभावाची
लढला पडला फुटला
तरी ढळला नाही त्याचा तोल
धन्यासाठी त्याने आपल्या
जीवा चे हि लावले मोल
महिने गेले वर्षे गेली
संपले शतकांवर शतक
उन वारे पाऊस झेलत
उभा होता अथक
गवत माजले चहूकडे
वेलींचा पोत चढला
धन्याविना दीनवाणा
गर्दीतही एकटा पडला
युगुले येति आडोशाला
होइ थोडी कुजबुज
येती कधी इतिहासतद्न्य
करीत बसती हितगुज
भरले वयोमान पाऊणशे
तरी शाबुत आहेत वासे
जणू वयोवृध्द हनुमंत
वाट अडवून बसला असे
गतवैभवाची स्वप्ने पाहत
गणित मांडून बसलाय
धन्याची वाट पाहून
किल्लाच आता थकलाय
जन्ममृत्यू फेऱ्या ची
तो बाळगत नाही तमा
उभा आहे तग धरून
शापित अश्वथामा.
– दर्शन

सोवळी

पहाट होता तुलाच स्मरता
स्पर्शली उन्हे कोवळी
जणू ओंजळ भरून सात्विक पुष्पे
उभी मूर्तीमंत तु सोवळी
– दर्शन

प्रहर

निद्रिस्त परि जागृत होतो
त्या स्वप्नाच्या गावात
येशील तु मज भेटण्या
त्या पहाटे च्या प्रहरात
– दर्शन

निर्झरा

घेइ जन्म गिरीवरी सुंदरा
निघे मग सोडूनी हात
समृध्द करावया सारी सृष्टी
गाणे जीवनाचे गात
दौडत धावत सुटली ती
जणू नवतरुणी चंचला
प्रियकरा भेटण्या धावतसे
प्रियतमा तोडुनी शृंखला
कुणी म्हणती गंगा नर्मदा
कुणी म्हणती गोदावरी
पाहती कुणी तिज मुर्तीरूपे
पुजती स्थापूनिया मंदिरी
घेइ रुप निर्झराचे खळाळ
कधी वाहे ओहोळ अवखळा
मवाळ करीती प्रवाह तिचे कधी
पाषाण र्हुदयी शिळा
भ्रष्ट करी मानव कधी तिज
निसर्ग होतसे प्रक्षुब्ध
रुद्रावतार दाखवूनी ती मग
सृष्टीस करीतसे स्तब्ध
जीवनदान हे सृष्टीचे देउनी
कृतकृत्य होतसे ति माता
फूलवुन नवी आयुष्ये तीरावरी
प्रसवते जीवनगाथा
विसर्जित करून अंतरंग सारे
सागरातळी समरसते
अथांगाशी एकरुप होऊनी
अखंडित प्रवाही राहते
– दर्शन

तू

स्निग्ध उना ची तिरीप
अन थंड तळ्या चे पाणी
पक्षी करती गुणगुण
गाती तुझीच गाणी
हिरवी सारी धरित्रि अन
निळा आसमंत सारा
तुझ्या पापण्यान्चि पिंपळपाने
हलवि मुजोर वारा
दवा ने भिजलि पाति अन
भिजले पान अन पान
फुले उमललि गुलाबी
रंगवुनि अवघे रान
सुंदर सुरुवात दिवसाची
दिवसचि हा सुंदर व्हावा
तुझ्या आठवणीन्चि गाणी
आजचा क्षण अन क्षण गावा
– दर्शन

पापण्या

पडता दवबिंदुंवर किरणे
ओलेत्या पापण्या तुझ्या स्मरल्या
मोत्यांच्या माळा जणू
क्षितिजावर अवतरल्या
– दर्शन

उगम

मन मी विचार तु
कवी मी कविता तु
शब्द मी शब्दार्थ तु
नदी मी पण उगम तु
– दर्शन

भावना

मिटले डोळे माझे तरी
तुझ्याच भावना फूलती
भावनांच्या हिंदोळ्यावर॔
मने आपुली झुलती
– दर्शन

क्षण

आनंदाचे काही क्षण ते
ओंजळीत माझ्या धरी
काही वाहती ओंजळ भरुनी
तीरावरल्या वाळूपरी
मोल क्षणाचे सांगे एक तो
कुणी धावपटू मना पासून
पाऊल एक ते ठेवी वंचित
त्या विजया च्या रेषेपासून
ढळता तोल शिखरावरुनी
तुटु लागती दोर जीवाचे
शाखा वृक्षाची लागता हाती
कळून येती मोल क्षणाचे
लडीवाळ क्षण एक असा
तिज वाटे स्तंभीत करावा
हास्य गोड असे बाळा चे
पाहता मातेचा उर भरावा
क्षण दुख्खा चे उभे रहाती
डोंगर बनूनी वाट अडविण्या
मोजकेच परि क्षण आनंदी
पुरेच पडती जीवन जगण्या
– दर्शन

खोडकर तुझ्या बटा

खोडकर तुझ्या बटा जेव्हा
झाकोळति नयन असे
पिंपळाचे पर्णजाल जणू
लपविती चंद्र जसे
– दर्शन

उत्तर

उत्तर मनातले तुझ्या
ओठावर तरळावे
पावसाळी नभची जसे
फुला वरी बरसावे
– दर्शन

हाक

हाक तुझी हृदयातली
जणु गाज सागराची
वळवीते माझ्या मना
ती धुंद साद सुरांची
– दर्शन

हृदय जिवंत ठेव

हृदय जिवंत ठेव
तुझे हृदय जिवंत ठेव
राजा झालास जगताचा
तरी तो फकीर जिवंत ठेव
विश्वासा च्या म्याने मधे
तो प्रयत्न जिवंत ठेव
हरलास जरी जीवनात या
तरी जिंकणे जिवंत ठेव
वाहणे जिवंत ठेव
तुझा निर्झर जिवंत ठेव
पण सागऱाला मिळण्याची
इच्छा जिवंत ठेव
मर्त्य असती सर्वची येथे
अमर नाही कुणी
झिजवुन घे स्वतहासी अवघे
तरी माणूसपण जिवंत ठेव
हृदय जिवंत ठेव
तुझे हृदय जिवंत ठेव
– दर्शन

जय व्हेलेंटाईन

पार्कात जोगिंग करता
पाहिली युगुलांची लाईन
…अरे हो…आज १४ फेब्रुवारी
बोला जय व्हेलेंटाईन
प्रेम करा खुल्लम खुल्ला
पण भरु नका फाईन
म्हणे आज १४ फेब्रुवारी
बोला जय व्हेलेंटाईन
एकमेका प्रेमी म्हणती
आज प्रेमगीते गाईन
म्हणे आज १४ फेब्रुवारी
बोला जय व्हेलेंटाईन
आमचा आपला सनडे आज
सुरमई फ्रायच खाईन
म्हणे आज १४ फेब्रुवारी
बोला जय व्हेलेंटाईन
मेणबत्त्या लाऊन घरीच
घेउ घोट्भर वाईन
म्हणे आज १४ फेब्रुवारी
बोला जय व्हेलेंटाईन
धावत असतो एरवी नुसतेच
घटका तिच्यासोबत घालवीन
हाच आपला १४ फेब्रुवारी
हाच आपला व्हेलेंटाईन
– दर्शन

वेल

स्वप्नातली मिठी तुझी
हळुवार सैल झाली
जेव्हा चंद्रिकेचि वेल एक
क्षितिजावरी उमटली
– दर्शन

लाली

लाली तुझ्या ओठांची
अंगणी शिंपडली
चाफ्या ची सुवर्णफुले
पूर्वेला अवतरली
– दर्शन

पुनर्जन्म घे शिवराय

पापदग्ध ही भूमी झाली
जन रडती मोकलुनी धाय
राष्ट्राचे भविष्य उजळण्या
पुनर्जन्म घे शिवराय
फितूर माजले चहुकडे
जन्मास घालती अफझल
राष्ट्रधना वरी फणा काढुनी
बसले भ्रष्टाचारी मुघल
धर्मवेडे ढग काळोखी
बुरूजांस पडले तडे
वाट आपली पाहूनी थकले
अवघे सहयाद्री चे कडे
चैतन्य पसरते आजही येथे
नाम आपुले येता ओठी
आशाळ नजरा पाहती
शिवनेऱी ची सज्जा कोठी
पसरवूनी प्रेम राष्ट्राचे
अभिमान उरी भरूनी राही
पुनश्च जन्मा ये शिवराया
अवतरुदे शिवशाही
– दर्शन

स्वप्न

काल रात्री केसांनी तुझ्या
माझ स्वप्नच झाकल
आणि आकाशात चंद्रालाही
ढगांनी व्यापल
– दर्शन

वारु

तोडून संयमा चे दावे
मनाचे वारु सुटावे
लांघुनी वादळे सगळी
मनासी तुझ्या भेटावे
माझ्या मनाची अवस्था
प्रतिमा तुझ्याच मनाची
प्रतिबिंब तुझ्या नयनांत
स्वप्ने माझ्या मनाची
– दर्शन

कप्पा

अडगळी च्या खोली मधला
एक जुनाट कप्पा
कप्पा कसला तो तर
आठवणींचा टप्पा
– दर्शन

मराठीचिया नगरी

ज्ञानेशा च्या दरबारी
संतांची असे मांदियाळी
या मराठीचिया नगरी
भाषा वसावी ओठी गळी
शब्दांचे वाहती पाट
अक्षरांसी पालवी फुटे
कुणी रचिती अभंगवाणी
गाती ज्ञानेश्वरी कुठे
अवकाश भरले मराठीचे
भू वरिही मराठी वसे
अशी ही सुंदर देववाणी
चिरंतन चराचरी दिसे
– दर्शन

अबोला

अबोला तुझा
एक रिकामी जागा करतं
अन ती भरण्यात मग
अक्ख आयुष्य सरतं
– दर्शन

अजब तुझा दरबार

अजब तुझा दरबार
शिवशंभू अजब तुझा दरबार
सुरासुर नाचती चोहीकडे तुझिया
गण भरती हुंकार
शिवशंभू अजब तुझा दरबार
शांत मुद्रा त्रिनेत्रधारी
कोपिता करिसि हाहाकार
शिवशंभू अजब तुझा दरबार
चर्चिले स्मशानभस्म सर्वांगा
बैसलास नंदीवरी होऊनी स्वार
शिवशंभू अजब तुझा दरबार
कंठी विष हलाहल जहाल
शिरी पवित्र गंगेची धार
शिवशंभू अजब तुझा दरबार
शक्तीरूप त्रिशूळ हाती
उमटे डमरूतुनी ॐकार
शिवशंभू अजब तुझा दरबार
अजब तुझा दरबार
शिवशंभू अजब तुझा दरबार
दर्शन