Sunday, February 12, 2017

आगमन तुझे गणेशा

गगनमंडली ढोल वाजती
आरत्या गाती जलधारा
सुवार्ता तुझ्या आगमनाची
देई निसर्गचि हा सारा
अनंत अमुर्त अणु रेणुन नी
घडवितो तुझी मुर्ती
त्रिखंडची सर्व व्यापूनी जावे
ऐसी तुझी कीर्ती
जळी स्थळी तर कधी पाषाणी
अवतरित तु होसी
चराचरी तुझेचि अस्तित्व
अवघा भरून तु राहसी
तुंदिलतनु तव शरीरावरुनी
सोडिली रुंद शुण्डा
आनंदाचे भरते येइ
पाहता तवरूप हे वक्रतुंडा
चतुःदिशा पसरोनी तुझे बाहु
रक्षण या जगताचे करिती
अर्धोन्मिलित नेत्र तुझे
मग भान मनाचे हरिती
अनंत हस्ते अलंकृत करूनी
तुजवरी भक्तीसुमने उधळली
आगमन तुझे या भुवरी झाले
अन मनज्योती उजळली.
– दर्शन

No comments:

Post a Comment