Sunday, February 12, 2017

किल्ला

आड वाटे वरी एका
किल्ला दिसे भग्न
आयुष्याची गणिते मांडत
बसला असे मग्न
जीर्ण विटा त्याच्या देती
साक्ष वैभवाची
नांदत होती येथे काही
माणसे जिवाभावाची
लढला पडला फुटला
तरी ढळला नाही त्याचा तोल
धन्यासाठी त्याने आपल्या
जीवा चे हि लावले मोल
महिने गेले वर्षे गेली
संपले शतकांवर शतक
उन वारे पाऊस झेलत
उभा होता अथक
गवत माजले चहूकडे
वेलींचा पोत चढला
धन्याविना दीनवाणा
गर्दीतही एकटा पडला
युगुले येति आडोशाला
होइ थोडी कुजबुज
येती कधी इतिहासतद्न्य
करीत बसती हितगुज
भरले वयोमान पाऊणशे
तरी शाबुत आहेत वासे
जणू वयोवृध्द हनुमंत
वाट अडवून बसला असे
गतवैभवाची स्वप्ने पाहत
गणित मांडून बसलाय
धन्याची वाट पाहून
किल्लाच आता थकलाय
जन्ममृत्यू फेऱ्या ची
तो बाळगत नाही तमा
उभा आहे तग धरून
शापित अश्वथामा.
– दर्शन

No comments:

Post a Comment